सोमवार, १६ डिसेंबर, २०१३

माझी माय

माझी माय

माय मपली गाय .. अन मी तिचं वासरू ....
खोपटात सांभाळी मले.. जणू एखाद पाखरू ...
दारिद्र्याच्या जाळात ... मपली माय रोजच जळे ..
पाहून मह्याकड .. मायच्या डोळ्यातून अश्रू रोजच गळे ....
अशी माझी माय ....
उपाशी पोटानच तिने मले दुध पाजलं ....
रगत म्हणजे काय असत ....? हे मी तेंव्हाच चाखलं ....
घेऊन कडेवर शेतात ती मले नेत होती .....
झाडाला झोळी बांधून मले त्यात टाकत होती ...
उन्हातान्हात घाम गाळून ती दिसभर राबत होती ...
खरतर ....
ती दिसरात तेंव्हा मरतच होती.....
स्वतासाठी नाय तर ती मह्यासाठी जगत होती....
अशी माझी माय ......
अशिक्षित मपली माय...
पर मले तिनं शाळत टाकलं ....
शिकून मोठ्ठा सायब हो ....
हे पण तिनंच मले सांगितलं ...
तेंव्हा मी शाळत जाताना ...
तिच्या काळवंडलेल्या चेहेर्यावर समाधान होत ....
शाळच्या फाटक्या कपड्यात बी ....
मह रूप तिले सुंदर वाटत होत ....
अशी माझी माय ....
विझनाऱ्या दिव्यातही तिला उजेडाची आशा होती ...
म्हणून तर ....
मिणमिणत्या दिव्याखाली मी अभ्यास करतानाही ....
ती मला रोजच बघत होती ......
सकाळच्याले मपली न्याहरी म्हणून....
रातच्याले ती उपाशीच राहत होती ...
अशी माझी माय .....
आयुष्यभर कष्ट करून तिने मले शिकवलं होत ....
मले आज साहेब बनवलं होत .....
आता वेळ होती तिची खरी जगण्याची .....
पण सुटाबुटात मले पाहून आज तिनं ...
समाधानान जीव सोडला होता ....
ज्या मायनं मले बनवलं ... मले घडवलं ...
तिन शेवटचा श्वासही मपल्याच हातात सोडला होता ...
अशी माझी माय ....
मह्यासाठी आयुष्यभर राबणारं शरीर ...
आज निर्जीव मह्या समोर होत ....
जीवनाच्या ह्या खेळावर हसावं कि रडावं ....
हेच मले कळत नव्हत .....
फाटक्या चोळी अन पातळात माय ....
जनम भर समाधानी राहिली .....
पण आज आसवं घेऊन डोळ्यामंदी ...
असमाधानाने तिले नवीन वस्त्र नेसविली..
अशी माझी माय ....
आज मी धाय मोकलून रडत होतो ....
आरडून तिले बोलवत होतो.....
शांत पहुडलेल्या मायशी मी बोलत होतो .....
मायवं..... मी रडताना आधी कशी पळत येत होती ....
मले काळजाले लावत होती ....
तुह्या पदराने मपले डोळे पुसत होती ....
पर आज का नाही येत .....??
मले काळजाले का नाही लावत ...??
महे डोळे आज पदरानं का नाही पुसत ...??
ए सांग न माय ....
मह्यावर तू आज का रागावलीस ....??
मले एकट्यालाच का सोडून गेलीस...??
पर ती आज समाधानी होती .....
म्हणून म्हयाशी बोलत नव्हती ....
अशी माझी माय .....
आज जीव मपला रडत होता ....
पर तिच्या चेहेऱ्यावर मात्र हसू होत .....
खर समाधान काय असत....
हे तिच्याकडेच बघून आज कळत होत.....
स्वतासाठी नाय त दुसऱ्यासाठी जगण्याची ....
आस मला तिच्यात दिसली होती ......
एकदाच मिळालेल्या आयुष्यालाही कसं जगावं ....
हे ती सांगूनच गेली होती ......
अशी माझी माय .....
                                        @    लेखक/ कवी    सागर वानखेडे
https://encrypted-tbn3.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcTbK71tm7XxyIuQQUahXtM3PxObeXPrm6-MjqHrh3mzAFvbnIek6bYKc7k

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा